हिंदू धर्मात तीन प्रमुख देवतांचा उल्लेख केला जातो. ज्यामध्ये श्री ब्रह्मदेव या सृष्टीचे निर्माते, श्री विष्णू पालक आणि श्री महादेव या सृष्टीचे संहारक आहेत. पुराण कथेनुसार श्री ब्रह्मदेवाची उत्पत्ती श्री महादेवाने केली त्याचप्रमाणे त्यांना सृष्टीच्या रचनेची जबाबदारी सोपवली. श्री ब्रह्मदेवास जेव्हा सृष्टीचा मानसिक विस्तार करणे अशक्य झाले तेव्हा त्यांनी एका सुंदर कन्या देवीला जन्म दिला, जिचे नाव सतरूपा होते. सतरुपेस सरस्वती, संध्या किवा ब्राह्मी सह अनेक भिन्न नावांनी ओळखले जाई.
सतरूपा अत्यंत सुंदर होती, श्री ब्रह्मदेवाने सतरुपेस पाहिले तेव्हा ते पाहताक्षणी तिच्या कडे आकर्षित झाले. ब्रह्मदेवाने यापूर्वी कधीच अशी सुंदरता पाहिली नव्हती. श्री ब्रह्मदेव सतरुपेचा पाठलाग करू लागले. श्री ब्रह्मदेवाच्या नजरेतून स्वतःचे रक्षण करण्याकरिता सतरूपा वेगवेगळ्या दिशांनी जाऊ लागली. जिथे कुठे देवी सतरूपा जाई तिथे तिच्यावर नजर ठेवण्यासाठी श्री ब्रह्मदेव त्या दिशेने एक नवीन शिर निर्माण करून घेत. अशाप्रकारे श्री ब्रह्मदेवाचे पाच शिर तयार झाले, चारही दिशांनी एक शिर आणि पाचवे शिर चारही शिरांच्या वर निर्माण केले.
श्री ब्रह्मदेवांच्या अशा वर्तनाने देवी सतरूपा अतिशय त्रासली होती. श्री ब्रह्मदेवांचे हे वर्तन श्री महादेव पहात होते आणि ते पाहून ते अत्यंत क्रोधित झाले. तसेच, त्याच क्षणी ते श्री ब्राह्म्देवांसमोर प्रकट झाले आणि त्यांचे पाचवे शिर कापून टाकले. तसेच, त्यांना श्राप दिला, कि सतरूपा तुमच्या द्वारे उत्पन्न झाली आहे आणि ती तुमची कन्या आहे.
अशा प्रकारे सतरुपेवर वाईट नजर टाकणे अतिशय चुकीचे आहे, तुम्ही अपवित्र झाले आहात. आजपासून तुम्हाला त्रिदेवांच्या पूजेत समाविष्ट केले जाणार नाही तसेच, ब्रह्मांडात तुमच्या पूजेस विशेष स्थान नसेल. या घटनेनंतर श्री ब्रह्मदेवास पश्चात्ताप झाला आणि त्यांच्या प्रत्येक मुखाद्वारे एक वेद पठण केले गेले.