श्री महादेवाने का केले तांडव नृत्य आणि श्री विष्णूस सुदर्शन चक्र का उचलावे- शिव पुराणातील मनोरंजक कथा

शिव तांडव

श्री ब्रह्मदेव पुत्र प्रजापती दक्ष यांची कन्या सती सह श्री महादेवांचा विवाह झाला. त्यानंतर कालांतराने प्रजापती दक्ष यांना संपूर्ण ब्रह्मांडाचे अधिपती बनविले गेले, त्यामुळे त्यांचा अहंकार वाढला आणि या संपूर्ण ब्रह्मांडात माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही असा त्यांचा समज होऊन ते स्वतःस श्रेष्ठ समजू लागले. एका यज्ञात श्री महादेवाने प्रजापती दक्ष यांस प्रणाम न केल्यामुळे प्रजापतीने श्री महादेवांप्रती अपशब्दांचा वापर करून श्राप दिला कि श्री महादेवांना या देवयज्ञामध्ये भाग घेता येणार नाही. दक्षाने दिलेला श्राप ऐकुन नंदीने सुद्धा दक्षास श्राप दिला, कि तो ज्या मुखातून श्री महादेवांची निंदा करतो आहे ते संपूर्ण शीर शेळीचे होऊन जाईल.

कालांतराने पुन्हा दक्षाने एका विशाल यज्ञाचे आयोजन केले. त्यामध्ये संपूर्ण देवी देवतांना आमंत्रित केले गेले, परंतु अहंकारी दक्षाने आपल्या अहंकारामुळे श्री महादेवांना यातुन बहिष्कृत केले. ही बाब सतीस लक्षात आल्यावर तिने कशीबशी श्री महादेवांना त्या यज्ञात जाण्याची अनुमती मागितली. श्री महादेवांनी अनेकदा समजून सांगितल्यावर सुद्धा देवी सती मानायला तयार नसल्याचे पाहून श्री महादेवांनी तिला यज्ञात जाण्याची अनुमती दिली.

जेव्हा सती आपल्या वडिलांकडे पोहोचली तेव्हा दक्षाने तिच्याकडे दुर्लक्ष केले. यज्ञात श्री महादेवांची अनुपस्थिती पाहून सती क्रोधित झाली आणि सर्वाना वाइटसाईट बोलू लागली. सतीस पाहून दक्षाने सुद्धा श्री महादेवांवर टीका करण्यास सुरुवात केली जे ऐकुन सतीस आत्यंतिक दुखः झाले आणि तिने योगाग्नी क्रियेने स्वतःचे शरीर भस्मसात केले. ते पाहून श्री महादेवांच्या गणांनी दक्षाच्या यज्ञावर हल्ला केला, परंतु देवांनी त्यांना तेथून हुड्कावून लावले आणि श्री महादेवांकडे जाऊन त्यांनी ती संपूर्ण घटना विषद केली.

हे सर्व ऐकुन श्री महादेव अतिशय क्रोधित झाले आणि क्रोधामध्ये त्यांनी आपली एक जटा उकलून जमिनीवर आपटली त्यातून वीरभद्र आणि महाकाली यांची उत्पत्ती झाली. श्री महादेवांनी त्यांना दक्षाच्या यज्ञास नष्ट करण्याची आज्ञा दिली. अशा प्रकारे त्यांनी यज्ञाचा विध्वंस केला आणि वीरभद्राने दक्षाचे शीर कापून त्या यज्ञकुंडात फेकून दिले.

हे पाहून देवांमध्ये हाहाकार मजला आणि त्यांनी श्री महादेवांना प्रसन्न करण्याकरिता शिव स्तुतीस प्रारंभ केला. त्या स्तुतीने प्रसन्न होऊन श्री महादेवांनी सर्वांना जीवन दान दिले आणि दक्षाच्या शरीरावर शेळीचे शीर लावून त्याला सुद्धा जिवंत केले. त्यानंतर श्री महादेवांची परवानगी घेऊन त्याने आपला यज्ञ पूर्ण केला.
आपली प्रिय पत्नी सती चे शव घेऊन श्री महादेव संपूर्ण ब्रम्हांडात फिरू लागले. त्यांच्या या प्रतापाने संपूर्ण सृष्टी जळू लागली. त्यावेळी श्री विष्णूने सुदर्शन चक्राद्वारे सतीच्या शरीराचे ५१ तुकडे केले. हे तुकडे जेथे जेथे पडले तेथे शक्ती पिठाची स्थापना झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *