असे काय झाले, कि श्री रामाने लक्ष्मणास मृत्युदंड दिले

पुराणांमध्ये रामायणाचे विशेष महत्व आहे. आपण सर्वच जाणतो, कि रावणाचा वध करून श्री राम अयोध्येत परतल्यानंतर श्री रामाने अयोध्येवर राज्य केले. राम राज्यात जनता अतिशय सुखी होती, जनतेस कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता.

परंतु, अयोध्येस परतल्यानंतर काही काळाने श्री रामासोबत एक विचित्र घटना घडली. एके दिवशी श्री रामाशी महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी यम (मृत्यू देवता) येतात. परंतु, चर्चा सुरु होण्यापूर्वी यमदेव श्री रामाला एक वचन मागतात, कि जोपर्यंत आपली चर्चा सुरु आहे, ती संपत नाही, तो पर्यंत आपल्या मध्ये कोणीही येणार नाही आणि जर कोणी आलेच तर आपणास त्यास मृत्युदंड द्यावा लागेल.

श्री रामाने या स्थितीस गंभीरतेने घेऊन लक्ष्मणास द्वारपाल म्हणून नियुक्त केले आणि त्यास बजावले कि कोणालाही आत येऊ द्यायचे नाही, नाहीतर ती व्यक्ती मृत्युदंडास पात्र असेल. थोरले बंधू श्री रामाची आज्ञा पाळत लक्ष्मण द्वारपाल बनला.

लक्ष्मणास द्वारपाल बनून काही काळच झाला कि अचानक दुर्वासा ऋषींचे आगमण झाले आणि त्यांनी श्री रामाशी भेटण्याची इच्छा दर्शविली. परंतु, कर्तव्यदक्ष लक्ष्मणाने नम्रतापूर्वक दुर्वासा ऋषींना श्री रामाशी भेटण्यास मनाई केली. हे ऐकुन ऋषी क्रोधित झाले आणि त्यांनी संपूर्ण अयोध्येस श्राप देण्याचे ठरवले.

लक्ष्मण द्विधा मनस्थितीत सापडला होता. एकीकडे श्री रामाच्या आज्ञेचे उल्लंघन आणि दुसरीकडे दुर्वासा ऋषींच्या श्रापाने अयोध्येवरील संकट. लक्ष्मणाने लागलीच अयोध्येस ऋषींच्या श्रापा पासून वाचवून स्वतः बलिदान देण्याचे ठरविले.

लगेच लक्ष्मणाने आत जाऊन दुर्वासा ऋषींच्या आगमणाची सूचना दिली. श्री राम हे ऐकुन चकित झाले, कारण कोणालाही आत प्रवेश देणे म्हणजे मृत्युदंडाची शिक्षा होती. यामदेवांशी चर्चा करून श्री रामाने दुर्वासा ऋषींची भेट घेतली. परंतु, भेट झाल्यानंतर श्री राम द्विधा मनःस्थितीत पडले, कारण त्यांना आपल्या वचनानुसार आता लक्ष्मणास मृत्युदंड द्यावयाचा होता. या द्विधा मनःस्थितीत श्री रामाने आपले गुरु वशिष्ट यांची मदत घेतली आणि या संकटातून काही मार्ग काढण्यास सांगीतले.

यावर वाशिष्टांनी सांगीतले, कि “तुम्ही लक्ष्मणास तुमच्यापासून दूर करा. तुमचा दुरावा हाच लक्ष्मणासाठी मृत्युदंडा समान असेल.” परंतु, श्री रामापासून दूर होण्याची गोष्ट जेव्हा लक्ष्मणाला समजली तेव्हा त्याने श्री रामाला म्हटले, कि “आपला दुरावा सहन करण्यापेक्षा मी मृत्यूला कवटाळीन.” असे म्हणून लक्ष्मणाने जल समाधी घेण्याचा निर्णय घेतला.

अशा प्रकारे राम आणि लक्ष्मण दोघांनीही आपआपल्या कर्तव्य आणि वाचनाचे पालन केले. म्हणून म्हणतात, कि “रघुकुल रिती सदा चाली आई. प्राण जाय पार वचन न जाई.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *